मुंबईत लुटमार करणारी टोळी कोल्हापूरमध्ये गजाआड

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन- पनवेल रेल्वे स्थानक परिसरात लुटमारी करणाऱ्या टोळीला कोल्हापूर जिल्ह्यात अटक करण्यात आली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील उजळाईवाडी महामार्गावर पोलिसांनी पाठलाग करुन या टोळीला अटक केली.

मुंबई आणि पनवेल परिसरात लूटमार करणारी टोळी पश्चिम महाराष्ट्रात दाखल झालेली आहे अशी माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. आज (गुरुवार) सकाळी महामार्ग पोलिसांच्या मुख्यालयातून यासंबंधीचा मेसेज पास करण्यात आला होता आणि सर्वांना अलर्ट रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूरच्या उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर  नाकाबंदी केली होती.

कोल्हापूर जवळ करण्यात आलेल्या या नाकाबंदी वेळी आंध्रप्रदेश पासिंगची एक गाडी संशयास्पदरीत्या आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असता पनवेल टोळीतील तीन आरोपीनी  गाडी जागेवर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महामार्ग पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं. महामार्ग पोलिसांनी पकडलेले तिघेजण हे आंध्र प्रदेश चे रहिवाशी असून त्यांच्यावर नवी मुंबई परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.