गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणारी महिलांची टोळी गजाआड

माजलगाव (बीड ) : पोलीसनामा ऑनलाईन – बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला माजलगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री माजलगाव बसस्थानकावर करण्यात आली. तर त्यांच्या इतर साथिदारांना बीडमधून अटक करण्यात आली. या टोळीत चार महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. आज (सोमवारी) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोयाबीन हरिभाऊ भोसले (१९ रा.सावरगाव) सुभाष सोमाजी उमाप (४५ रा.ब्रम्हगाव) धूपता परमेश्वर जाधव (५० रा.गांधीनगर, बीड), शोभा संजय भालेराव (४० रा.रमाई चौक, बीड), मंगल सतीश तुसाबर (४२ रा.बलभीमनगर, बीड) अशी पकडलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.

सादोळा येथे राहणाऱ्या माधुरी सोळंके यांना बीडला जायचे असल्याने त्या माजलगाव बस स्थानकावर दुपारी तीनच्या सुमार आल्या. दुपारी तीनच्या सुमारास बीडला जाणारी बस येताच गाडीत जाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीचा फादा घेत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठन चोरट्यांनी लंपास केले. सोळंके या बसमध्ये आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोलीस उप निरीक्षक एस.एस.बिराजदार यांनी स्थानकात धाव घेत कॅमेरे तपासले. यावेळी त्यांना काही महिलांवर संशय आला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी सोयाबीन आणि सुभाषला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आपल्या साथिदारांची नावे सांगितली. त्यानंतर रविवारी रात्रीच माजलगाव पोलीस बीडमध्ये आले. त्यांनी आणखी तीन महिलांना ताब्यात घेतले. आज (सोमवारी) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एस.एस.बिराजदार, सफौ. सुंदर पवार, पोलीस नाईक किशोर राऊत, श्रीमंत पवार, संजिवणी सोन्नर आदींनी केली.

Loading...
You might also like