कुर्ल्यात नववर्षाच्या रात्री सामुहिक बलात्कार करणारे दोघे जेरबंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – थर्टी फर्स्टच्या रात्री दारुच्या नशेत तिघा जणांच्या टोळक्याने एका विवाहितेला पकडून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार कुर्ल्यात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी मुक्तार शेख (वय ३९), शाहीद आरीफ (वय ४८) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

कुर्ला परिसरात ३० वर्षाची विवाहिता कुटुंबीयांसोबत राहते. थर्टी फर्स्टच्या रात्री ती घराजवळील सार्वजनिक शौचालयाकडे निघाली. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या या तिघा जणांनी तिला एकटीला जाताना पाहिले. नशेत त्यांनी तिला बळजबरीने एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या अवस्थेत महिलेने घर गाठले. याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. अखेर दोन दिवसांनंतर महिलेने याबाबत कुटुंबीयांना सांगितले आणि कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर, एका आरोपीने पळ काढला, तर आरिफ आणि शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.