धक्कादायक ! विरोधी गुंडाला धडा शिकविण्यासाठी सामुहिक बलात्कार, नागपूर मधील घटना

नागपूर : पूर्वीच्या काळी खालच्या जातीतील लोकांना धडा शिकविण्यासाठी उच्च जातीकडून त्या जातीतील महिलांवर सामुहिक बलात्कार घडवून आणले जात होते. आजही उत्तर प्रदेशात उच्च जातीतील तरुणाकडून खालच्या जातीतील महिला, तरुणीवर अत्याचार केल्या तरी उच्च जातीच्या तरुणाला गावागावांमध्ये पाठिंबा दिला जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, नागपूरात विरोधी गुंडाला धडा शिकविण्यासाठी कुख्यात रोहित रामटेके याने एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार घडवून आणल्याचे समोर आले आहे. अजनी पोलिसांनी रोहित रामटेके याला अटक केली आहे.

अजनीतील एका अल्पवयीन मुलीवर कुख्यात गुंड दत्तू खाटीक, अनिल लोखंडे, प्रतिक रोडे आणि वाघमारे अशा गुंडानी सामुहिक बलात्कार केल्याची तक्रार एका अल्पवयीन मुलीने गेल्या महिन्यात अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली होती.

हा सामुहिक बलात्कार का झाला, याचा तपास करीत असताना पोलिसांना हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला. तक्रार करणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत जी तरुणी होती, ती रोहित रामटेके याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. रामटेके याच्या विरोधी गुंड खाटीक याने तीन महिन्यांपूर्वी रामटेकेविरुद्ध असाच एक सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आणि गुंड खाटीक तसेच त्याच्या साथीदारांना धडा शिकविण्यासाठी त्याने हा सामुहिक बलात्कार घडवून आणला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी रोहित रामटेके याला अटक केली आहे.