संतापजनक ! सोलापूरात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, 5 रिक्षा चालकांना अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मंदिराबाहेर रडत बसलेल्या अल्पवयीन मुलीची चौकशी करुन एका दक्ष नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या चौकशीत या अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजापूर नाका पोलिसांनी रिक्षाचालकांसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन ५ जणांना अटक केली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. यामध्ये ५ ते ६ रिक्षाचालकांचा समावेश आहे.

एका दक्ष नागरिकामुळे हा प्रकार उघडकीस आला. ही अल्पवयीन मुलगी येथील एका कॉलेजमध्ये अकरावीत शिकत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता ती एका मंदिराजवळ रडत बसली होती. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने तिची विचारपूस केली. बाळा तुला काय झाले आहे, अशी विचारणा केली. तेव्हा तिने पोट दुखत असल्याचे सांगितले. त्या नागरिकांना मुलीबाबत काहीतरी विपरीत प्रसंग झाल्याचा संशय आला. त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. विजापूर नाका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस तातडीने तेथे पोहचल्या व तिची चौकशी करुन पोलीस ठाण्यात आणले. मुलीने सुरुवातीला माहिती दिली नाही. मात्र तिला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर तिच्यावरील सामुहिक अत्याचाराचा प्रकार तिने सांगितला.

ही अल्पवयीन मुलगी जून महिन्यापासून रिक्षाने कॉलेजला येत होती. नेहमीच्या जाण्या – येण्यातून एका रिक्षाचालकाशी तोंडओळख झाली. एके दिवशी त्याने तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांनंतर दुसऱ्या एका रिक्षाचालकाने तिच्यासोबत असाच प्रकार केला. तिसऱ्या रिक्षाचालकाने ही असाच प्रकार केला. मात्र, काही दिवसांनंतर त्याने त्याच्यासोबतच्या ४ ते ५ मित्रांसोबत आळीपाळीने अत्याचार केला होता. दीड महिन्यांपूर्वी तिच्यावर निर्जन ठिकाणी सामुहिक अत्याचार झाला होता. तिच्यावर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्यातील पाच रिक्षाचालकांना अटक केली.

पोलिसांना कॉल आल्यानंतर त्यांनी तिची आपुलकीने चौकशी केली. तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने आपल्यावरील सामूहिक अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला घरी पाठविले असते तर कदाचित हा गुन्हा उघडकीस आला नसता. पाच जणांना अटक केली असून इतरांनाही अटक केली जाईल, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी दिली.