धक्कादायक ! दुष्काळामुळे मराठवाड्यातून मुंबईत गेलेल्या मुलीवर सामुहिक अत्याचार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या पाठ सोडायला तयार नाहीत. दुष्काळ असल्याने हाताला काम नसल्याने अनेकांनी कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर केले. मराठवाड्यात हाताला काम नसल्याने मुंबईत कामाला आलेल्या एका तरुणीला आपले सर्वस्व गमावण्याची वेळ आली आहे. चेंबूर येथे केटरींगचे काम करायला आलेल्या एका मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने तिच्यावर औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडीत मुलगी जालना जिल्ह्यातील असून गावाकडे दुष्काळ असल्याने ती कामासाठी मुंबई येथे गेली होती. मुंबईत तिला केटरींगचे काम मिळाले. आठ दिवसांपूर्वी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. त्या रात्री घरी परत आणि घराच्या बाहेर पडलीच नाही. अचानक तिची प्रकृती खालावू लागली. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला परत औरंगाबाद येथे आणले.

गावी आल्यानंतर पीडित मुलीची प्रकृती अजूनच बिघडली. तिच्या कमरेखालचा भाग बधीर होत गेला. तिला अर्धांगवायूचा झटका आला असल्याची शंका तिच्या कुटुंबीयांना आली. तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या घरच्यांना धक्का बसला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर तपासणीत तिच्या शरिरावर जखमा आढळून आल्या. वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने चेंबूर येथे आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती सांगितली. या दुष्काळामुळे तिचे सर्वस्व गेले.