लूटमार करणारी टोळी गजाआड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – बुद्धविहार रोड दापोडी येथे कोयत्याचा धाक दाखवून तिघांना लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

प्रकाश मारुती कटकधोड (20), साहिल अल्लाबक्ष मुकरताल (19), कासीम मोला मोरशद (22), अमोल बसवराज वाल (20, सर्व रा. निगडी), गणेश बाळासाहेब मतकर (19), नितेश खंडू साहिज (20, दोघे रा. तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चेतन गणेश सपकाळ (22, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास चेतन त्यांचे मित्र राकेश जगताप, निखिल खरात यांच्यासोबत गप्पा मारत बुद्धविहार रोड दापोडी येथील गोल्डन चहाच्या टपरीसमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी कोयत्यासारखे शस्त्र चेतन यांच्या गळ्याला लावले.

तसेच त्यांच्या मित्रांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत, चेतन यांच्या खिशातून 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि आठ हजार रोख रक्कम, राकेशच्या खिशातून 2 हजार 800 रुपये रक्कम आणि निखिलच्या खिशातून 2 हजार 500 रुपये असा एकूण 25 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसरी पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे, देवेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने तपास करत सर्व आरोपींना अटक केली आहे. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.