दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

पुणे : पोलीनामा ऑनलाईन – कोंढव्यातील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दोन कोयते, दोन सत्तुर, एक फायटर व इतर साहित्य असा दोन लाख ८ल हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे (२२, अप्पर इंदिरानगर), गौरव उर्फ लाल्या सुहास फडणीस(२७, पर्वतीदर्शन), चाँद फकरूद्दीन शेख (२०, अप्पर इंदिरानगर), गणेश बाळासाहेब कांबळे (२१, सुपर अप्पर इंदिरा नगर), सुर्यकांत किसन कोळी (२३, घोरपडी पेठ), तोहित तय्यब काझी (२८, घोरपडे पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एस. के. ऑटो केअर या पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत काहीजण आहेत. ते ग्रीन पार्क सोसायटीच्या कंपाउंडच्या भिंतीशेजारी उभे असल्याची माहिती युनीट पाचच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याजवळ कोयते, सत्तुर आणि मिरचीपुडच्या पुड्या, पेपर स्प्रे असा दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून तीन दुचाकी आणि इतर साहित्य असा दोन लाख ८ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास युनीट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. तासगावकर करत आहेत.