रस्त्याने पायी जाणाऱ्यांवर हल्ला करुन लुटणारी टोळी गजाआड

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्यावरुन पायी जाणाऱ्यांवर हल्ला करुन शस्त्राचा धाकाने लुटणाऱ्या टोळीला सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. कोरेगाव रस्त्यावर एकावर चाकूने वार करुन अडीच हजार रुपयांची जबरी चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळीला अटक केली आहे.

गणेश शंकर माळवे (वय २०, रा. वर्धनगड, ता. कोरेगाव), सचिन विजय बुधावले (२१, रामोशीवाडी, ता. कोरेगाव), पवन मधुकर बुधावले (रा. रामोशीवाडी, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तानाजी जाधव (२४, जळगाव, ता. कोरेगाव) हा दि. २३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव रस्त्याने जात असताना सर्वोदय कॉलेजसमोर लघुशंकेसाठी थांबला असता, त्यावेळी एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी अक्षयवर चाकूने हल्ला करून त्याच्या खिशातील एक हजार रुपये व मोबाईल अशा एकूण अडीच हजार रुपयांची चोरी केली.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. जी. दवणे यांच्या पथकाने सापळा रचून वेगवेगळ्या ठिकाणांवरून गणेश माळवे, सचिन बुधावले, पवन बुधावले यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्याचबरोबर चोरीसाठी वापरलेली दुचाकी कुंभारवाडा, ता. कोरेगाव येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला घेतला आहे. या आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक डी. जे. ढवळे, पोलीस नाईक शिवाजी भिसे, अनिल स्वामी, पंकज ढाणे, अविनाश चव्हाण, धीरज कुंभार सुनील भोसले, अमोल साळुंखे, मुनीर मुल्ला, नीलेश गायकवाड, मंगेश सोनवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.