अलिशान बंगल्यात चक्क गांजाची शेती

पणजी : वृत्तसंस्था – ते पॉश बंगल्यात राहतात. अलिशान गाड्यांमधून फिरतात. पण ते नेमके काम काय करतात, याची आजू बाजूच्या लोकांना माहिती नव्हती. त्यामुळे त्या अंग्लो इंडियन कुटुंबाविषयी परिसरातील लोकांमध्ये चर्चा होती. शेवटी लोकांना असलेल्या प्रश्नाचे उत्तर गोव्यातील गुन्हा अन्वेषण विभागाने दिले आहे. हे श्रींमत कुटुंब चक्क आपल्या पॉश बंगल्यात गांजाची शेती करीत असल्याचे आढळून आले आहे.

आडगावात अथवा पोलीस जेथे सहजा सहजी पोहचू शकत नाहीत, अशा दुर्गम भागात गांजाची शेती इतर पिकांमध्ये गुपचूप लपवून केली जाते. ओडिशा, तेलंगणा या नक्षलग्रस्त भागात प्रामुख्याने अनेक ठिकाणी गांजाची शेती करुन तो सर्वत्र देशभर पोहचविला जातो. पण आलिशान बंगल्यात गांजाची शेती करण्याचा प्रकार प्रथमच उघड झाला आहे.

आपल्या बंगल्या बाहेरच्या गार्डनमध्येच गांजाची लागवड करणाऱ्या ख्रिस्तोफर मायकल पेटिन्सन नामक २० वर्षाच्या युवकाला गोवा पोलिसाच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. लागवड केलेला ३.५ लाख रुपयांचा गांजाही जप्त केला आहे. हा गांजा तो व्यावसायिक तत्वावर पिकवित होता. संशयिताचे वडिल ब्रिटिश नागरिक आहेत आणि गोव्यातील महिलेशी त्याचा विवाह झाला होता. संशयित ख्रिस्तोफरचा जन्मही गोव्यातच झाला.

ख्रिस्तोफर अंमली पदार्थांचा व्यवहार करीत असल्याचा संशय पोलिसांना होता. तशी माहितीही त्यांना मिळाली होती. योग्यवेळ साधून पोलिस निरीक्षक राजन निगळय आणि राहूल परब यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई करून पुराव्यांसह संशयिताला अटक करण्यात आली. संशयिताने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. दरम्यान गांजा लागवडीच्या घटना राज्यात बऱ्याच उघडकीस येवू लागल्या आहेत. यापूर्वी कळंगूट येथे छापा टाकून क्राईम ब्रँचने एका फ्लॅटमध्ये करण्यात आलेली गांजा लागवड उघडकीस आणली होती.

लांडेवाडी चौकातुन गावठी कट्टयासह 2 काडतुसे जप्‍त