Video : ‘हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार’, संजय राऊत संतापले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीवरुन विरोधकांनी केंद्र व योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यातच शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार आहे’ असे म्हणत राहुल गांधी यांना झालेल्या धक्क्याबुक्कीचा राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते वार्ताहारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, त्यांची कॉलर पडकली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणार नाही. एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून करण्यात आला. याविरुद्ध विरोधी पक्षांनी आवाज उठवायचा नाही ? ही कुठली लोकशाही आहे ? हा प्रकार म्हणजे स्वातंत्र आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Advt.

त्यांना इतिहास माफ करणार नाही

“राहुल गांधी खासदार आहेत. त्याचबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी बलिदान दिल आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर ज्यांना पडला आहे, त्यांना इतिहास माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी देशात विरोधी पक्षाने बोलूच नये अशी भूमिका घेणे ही पूर्णपणे चुकीची आहे. देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल” असे राऊत म्हणाले.

बेटी बचाओ नाही तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचावा’ हीच भाजपाची घोषणा

बलरामपूरमध्ये सुद्धा एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरुन राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पुन्हा भाजप आणि योगी सरकारवर घणाघात केला आहे. “उत्तरप्रदेशच्या जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची दडपशाही सुरु आहे. जिवंत असताना कधी त्यांना सन्मान दिला नाही आणि मृत्यू नंतर देखील त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार दिला नाही. बेटी बचाओ नाही तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’ हीच भाजपाची घोषणा” असे ट्विट करत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.