गँगस्टर अरिफ शहा याचा चाकूने भोसकून खुन

यवतमाळ : खुन, अपहरण, खंडणी, वाटमारी, धमकाविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला गँगस्टर अरिफ शहा याच्यावर चाकूने हल्ला करुन त्याचा खुन करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मार्केटच्या मागील मैदानात सोमवारी रात्री सव्वादहा वाजता ही घटना घडली.

अरिफ शहा याने गेल्या काही वर्षापासून स्वत:ची टोळी निर्माण केली होती. त्याचा शहरात दबदबा होता. त्याचवेळी प्रविण दिवटे याची टोळी सक्रीय झाल्याने गेल्या काही वर्षांपासून अरिफ शहा याचे साम्राज्य विठ्ठलवाडी पुरते मर्यादित झाले होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून तो व्यसनाच्या आहारी गेला होता.

अरिफ शहा हा सोमवारी रात्री भाजी मार्केटमागील मैदानात गेला होता. त्यावेळी तिघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला करुन त्याचा खुन केला. शहा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघे हल्लेखोर पळून गेले. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शहा याला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता़ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.