पॅरोलवर सुटल्यानंतर ‘डॅडी’ अरूण गवळीची ‘क्वीन’वर ‘नजर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. करोडो लोक आपल्या घरात बंद आहेत. या दरम्यान सर्वसामान्यांपासून राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत , आपआपला छंद जोपासत आहे. एवढेच नव्हे तर पॅरोलवर सुटलेला अंडरवर्ल्ड डॉन अर्थात डॅडी अरुण गवळी देखील लॉकडाऊन दरम्यान आपल्या कुटुंबियांसोबत कॅरम खेळत वेळ घालविताना दिसत आहे.

सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, पत्नी आजारी असल्याचं कारण सांगून त्याने पॅरोलच्या रजेसाठी कोर्टात अर्ज केला होता, जो २७ फेब्रुवारीला मंजूर केला गेला. त्यानंतर त्याने भायखळ्याच्या आपल्या घरी दगडी चाळीत कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली. त्यांनतर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे डॅडीलाही घरातच राहावं भाग असल्याने त्याने त्याच्या कुटुंबीयांसोबत कॅरम खेळत वेळ घालवायाला सुरुवात केली आहे. हा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून दिसून येते कि, कॅरम खेळतानाही क्वीन कशी जिंकता येईल, याकडे डॅडीची नजर आहे.

गवळी याचा जावई अक्षय वाघमारेने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात अरुण गवळी, त्याची पत्नी आशा गवळी आणि मुलगी नगरसेविका गीता गवळी कॅरम खेळून लॉकडाऊन दरम्यान मज्जा लुटत आहे. दरम्यान, याआधीही गवळी पॅरोलवर सुटून मुंबईत आला होता. त्याची वर्तवणूक चांगली असल्याने त्याला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करण्यात आल्याचं समजते.