50 लाखाच्या खंडणी प्रकरणी छोटा राजनच्या गँगमधील मंदार वाईकरला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुसर्‍या पत्नीला घटस्फोट देऊन ५० लाख रुपयांची खंडणी छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने राजगुरुनगरचे माजी उपसभापती राजेश जवळेकर यांना मागितली होती. या प्रकरणात फरारी असलेल्या छोट्या राजनचा राईट हँट म्हटल्या जाणार्‍या मंदार वाईकर याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेने रात्री उशिरा जेरबंद केले.

मंदार वाईकर हा बिबवेवाडी राहात असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी राजेश जवळेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची दुसरी पत्नी व तिची बहिण यांनी जवळेकर यांच्याकडे मर्सिडिज गाडीची मागणी केली होती. ती जवळेकर हे पूर्ण करु शकले नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून जवळेकर यांची दुसरी पत्नी अश्विनी हिचे मंदार वाईकर याच्या मित्राशी संबंध जुळाले होते. त्यामुळे तिला जवळेकर यांच्याकडून सुटका हवी होती. तिने छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे (रा. जांभुळकरनगर, वानवडी) हिच्याकडे तक्रार केली होती. त्यावरुन प्रियदर्शनी हिने धीरज साबळे याला सांगून जवळेकर यांना बोलावून घेतले होते. तेथे तिने जवळेकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली.

तू अश्विनीला डिव्होर्स दे कारण अश्विनी हिचे मंदार यांच्या मित्राशी गेल्या ६ महिन्यांपासून अफेअर आहे. मंदार आमचा छोटा राजन कंपनीचा राईट हँड आहे. बायकोला घटस्फोट दिला नाही तर पिस्तुलातील १० च्या १० गोळ्या घालून मारुन टाकेल, अशी धमकी दिली होती.

त्यानंतर जवळेकर यांनी घाबरुन गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली होती. त्यांनी २५ लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या छोटा राजनचा हस्तक धीरज साबळे याला सापळा लावून अटक केली होती. त्यानंतर प्रियदर्शनी निकाळजे व मंदार वाईकर हे फरार झाले होते. त्यातील वाईकर याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता प्रियदर्शनी निकाळजे हिचा शोध सुरु आहे.