छोटा राजनचा हस्तक गँगस्टर डी. के. राववर कोर्ट परिसरात हल्ला

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड छोटा राजनचा हस्तक गँगस्टर दिलीप बोरा उर्फ डी.के. राव याच्यावर सत्र न्यायालयाच्या परिसरात हल्ला झाला. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. पाटीलच्या तावडीतून वाचण्यासाठी राव याने तेथून पळ काढत न्यायाधीशांकडे धाव घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

डी. के. राव याच्यावर खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि खून असे एकूण ३० गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील अनेक प्रकरणांमध्ये त्याची सुटका झाली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला २०१८ मध्ये शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. ‘मकोका’ कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. राव आणि त्याचा साथीदार पाटील याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांची दोन पथके त्यांच्यासोबत होती.

सुनावणीसाठी आलेले ते दोघे आणि पोलीस न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पायरीवर थांबले होते. त्यावेळी राव याने पाटीलला एका बिल्डरला मेसेज पाठवून पैशांसंबंधी बोलण्यास सांगितले. पाटील याने मान्य केले मात्र उद्धटपणे उत्तर दिल्याचा राग रावला आला. राव याने पाटीलला हळू आवाजात बोलण्यास सांगितले आणि त्याच्या डोक्यात फटका मारला. यामुळे चिडलेल्या पाटीलने रावला पकडून मारण्यास सुरूवात केली. पाटीलच्या टोळीतील काही लोकही धावून आले. त्यामुळे घाबरलेल्या रावने तेथून पळ काढल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेमुळे कोर्ट परिसरात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणी पाटीलने राव विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

You might also like