गँगस्टर रवी पुजारीने स्वतःची पोलिस कोठडी वाढविण्यासाठी केली विनवणी, म्हणाला – ‘मला तपास अधिकार्‍यांना महत्वाची माहिती द्यायची आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्याच्यावर ५५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, अशा कुख्यात गँगस्टरला न्यायालयाने पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पण, स्वत: गँगस्टरने आपल्याला न्यायालयीन कोठडी नव्हे तर पोलीस कोठडी हवी असल्याची मागणी केल्याने संपूर्ण न्यायालय अवाक झाले. शेवटी न्यायालयाने या गँगस्टरला ५ दिवसांची कोठडी मंजूर केली. आता या ५ दिवसात हा गँगस्टर पोलिसांना काय माहिती देतो, या विषयी पोलीस दलासह सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
रवी पुजारी असे या गँगस्टरचे नाव आहे.

मला तपास अधिकार्‍यांना काही महत्वाची माहिती द्यायची आहे, असे कुख्यात गँगस्टर रवी पुजारीने मंगळवारी स्वत:च विशेष मोक्का न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत १५ मार्चपर्यंत वाढ केली आहे. परदेशात बसून बॉलीवूडमधील कलावंत व बांधकाम व्यावसायिकांना फोन वरुन धमकावून साथीदारांच्या मदतीने खंडणी उकळल्याचे जवळपास ५५ गुन्हे रवी पुजारीवर नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय खुन, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका प्रकरणात त्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांना खंडणीसाठी धमकाविले होते. त्यानंतर त्या प्रकरणात काही जणांनी मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. याप्रकरणातील मनसुख हिरेन प्रकरणातही रवी पुजारी काय खुलासा करणार का ? रवी पुजारी हा नेमकी काय माहिती पोलीस अधिकार्‍यांना देणार ? की आणखी काय या विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

विलेपार्लेमध्ये एका उपाहारगृहावर केलेल्या गोळीबार प्रकरणात सध्या तो पोलीस कोठडीत आहेत. त्याची कोठडीची मुदत संपल्याने त्याला विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांच्या न्यायालयात हजर केले. तेव्हा पुजारी याच्या वकिलाने पोलीस कोठडीतील चौकशीसाठी पुरेसा अवधी मिळाला असल्याने आणखी पोलीस कोठडी देऊ नये, अशी विनंती केली. आरोपींचा कबुली जबाब सक्षम प्राधिकार्‍यासमोर नोंदवण्यात आला आहे. त्याअनुषंगाने त्याची आणखी चौकशी करणे आवश्यक आहे, असे सांगून पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकील सुनील गोन्साल्विन्स यांनी केली.

सुनावणी दरम्यान पुजारीनेही आपल्याला काही सांगायचे असल्याने बोलू देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायाधीशांनी पुजारीला परवानगी दिल्याने त्याने सांगितले की, मला तपास अधिकार्‍यांना काही महत्वाची माहिती द्यायची आहे आणि त्यामुळे पोलीस कोठडी आणखी ५ दिवसांनी वाढवण्यास मला हरकत नाही, असे म्हणणे मांडले. त्यानंतर न्यायाधीशांनी पुजारीच्या पोलीस कोठडीत १५ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

आता रवी पुजारी नेमकी कोणती माहिती पोलिसांना देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी त्याच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. रवी पुजारी हा आफ्रिकेतील सेनेगलमध्ये लपून बसला होता. वर्षभरापूर्वी बंगळुरु पोलिसांनी सेनेगल पोलिसांकडून त्यांचा ताबा मिळविला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात रवी पुजारीचा मुंबई पोलिसांना ताबा मिळाला आहे.