वर्दळीच्या रस्त्यावरील हॉटेलमध्ये टोळक्याचा राडा; तोडफोड करत केले हत्याराने वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वर्दळीच्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये घुसून टोळक्याने साहित्याची तोडफोड करत मोठे नुकसान केले. तसेच कामगारांवर हत्याराने वार करुन गंभीर जखमी करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे रात्री आठच्या सुमारास या टोळक्याने घरात घुसून हा राडा केला आहे. या राड्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले असून हल्लेखोर खुले आम रस्त्यावर कोयता घेऊन फिरताना दिसत आहेत.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये फेज दोनकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकालगत हॉटेल पंजाब रसोई हे आहे.  बुधवारी रात्री आठच्या सुमारास हॉटेल सुरु असताना एका पाठोपाठ एक असे दहा-पंधरा जणांचे टोळके आत घुसले. काही वेळातच हॉटेलमधील टेबल, काउंटर व इतर साहित्याची तोडफोड करत राडा केला. हॉटेलच्या कामगारांना बाहेर काढत मारहाण केली. तर काहींवर कोयता, चॉपरने वार करुन गंभीर जखमी केले.

हल्लेखोर हातात कोयते, चॉपर घेऊन दहशत माजवत होते. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले . याबाबतची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.