गँगस्टर सुख बिकरीवाल याला दिल्ली विमानतळावर अटक

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आयएसआयशी संगनमत करुन पंजाबमध्ये अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करणारा गँगस्टर सुखमीत पाल सिंह ऊर्फ सुख बिकरीवाल (Sukh Bikriwal) याला दिल्ली पोलीस स्पेशल सेलने दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) अटक केली आहे. दुबईहून त्याची हकालपट्टी केल्यावर दुबई पोलिसांनी त्याला अटक करुन विमानात बसवून भारतात पाठविण्यात आले होते. त्याच्याकडील चौकशी भारतात अशांत पसरविण्याच्या पाकिस्तानच्या इराद्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

भारतात अशांत निर्माण करण्यासाठी त्याने पंजाब व कश्मीरी अतिरेक्यांशी हातमिळवणी केली होती.

अतिरेक्यांविरुद्ध मोहिम उघडणार्‍या पोलीस अधिकारी बलविंदर सिंह संधु यांच्या हत्येची सुख बिकरीवाल याने सुपारी दिली होती. या हत्येप्रकरणात पकडण्यात आलेल्या ५ अतिरेक्यांपैकी तिघांना सुपारी दिली होती.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा मोहरा म्हणून सुख बिकरीवाल काम करत होता. खालिस्तानीचा आवाज बनण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याच्या अटकेनंतर आता खालिस्तानी चळवळीला कोण मदत करते, याची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.