कचरा बंद आंदोलन गावकर्‍यांकडून स्थगित ! महापौरांच्या प्रयत्नांना यश, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गावकर्‍यांचा निर्णय

पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेली विनंती कचरा डेपो हटाव संघर्ष समितीच्या वतीने मान्य करण्यात आली असून २१ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र समितीच्या वतीने महापौरांना देण्यात आले आहे. त्यावर लवकरच कृती आराखडा करुन कार्यवाही करणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट आहे.

कचरा बंद आंदोलन मागे घ्यावे, यासाठी महापौर मोहोळ यांनी सुरुवातीपासूनच गावकर्‍यांशी संवाद सुरु ठेवला होता. कचरा डंपिंग बंद करावे यासह आणखीही काही मागण्या समितीच्या वतीने करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा महापौरांकडून सर्वच पातळीवर सुरू होती. शिवाय कोरोनाच्या शहरातील फैलावाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवासांपूर्वी महापौर मोहोळ यांनी गावकर्‍यांशी सविस्तर चर्चा करत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यावर गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, कचरा बंद आंदोलनासोबत समितीने विविध मागण्या केलेल्या आहेत. त्याबाबत तातडीने कृती आराखडा तयार करुन कार्यवाही करण्यात येणार आहे. शिवाय वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामे करण्यात येणार आहेत. तसेच माझ्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त यांच्यासह समिती आणि दोन्ही गावांतील प्रतिनिधींचा समावेश असणारी समिती स्थापून ती समिती देखभाल आणि नियंत्रण यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

दरम्यान, आंदोलक ग्रामस्थांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत घेत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. कचरा, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाकडे तसेच अतिक्रमणांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच करोना सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे नियम ठरवून दिलेले असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने दोन कोटी रुपये भरपाईही महापालिकेकडून करून घेतली आहे तरीही कचरा डंपींग बंद करण्याची कार्यवाही केली गेली नाही. हा न्यायाधीकरणाचा अवमान असून, आम्ही महापालिकेवर अवमान याचिका दाखल करू, असे ग्रामस्थांच्यावतीने एनजीटीमध्ये केलेल्या याचिकेवर ग्रामस्थांची बाजू मांडणारे ऍड. असिम सरोदे यांनी यावेळी सांगितले.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांनी आंदोलनाबाबत एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. असे असले तरी आंदोलन पुढे सुरूच राहणार आहे. याशिवाय महापालिकेने दोनशे मेट्रिक टनाचा जो नवा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यालाही आमचा विरोध आहे, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. यावेळी ऍड. असीम सरोदे, विशाल हरपळे, बाळासाहेब हरपळे, भगवान भाडळे, तात्यासाहेब भाडळे, दिलीप मेहता आदी आंदोलक उपस्थित होत
.