‘मोबाईल App’ वर मिळणार घंटागाडीची माहिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने मनपाने अँड्राईड अ‍ॅप तयार केले असून, हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्ले स्टोअरमधून Ahmednagar-SWM टाकून ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

महापालिकेचे अपुरे कर्मचारी, कचरा संकलनासाठी अपुरी यंत्रणा यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने कचरा संकलन व वाहतुकीचे खासगीकरण केले आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट या अनुभवी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कचरा संकलनाच्या प्रक्रियेत सुसूत्रता येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अद्यापही घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी काही भागातून येत आहेत. कचरा संकलन करणार्‍या वाहनांना रोडमॅप तयार करुन देण्यात आलेला आहे. या वाहनांना जीपीएस लावण्यात आले असून, त्याचे नियंत्रणही मोबाईल अ‍ॅपवरुन केले जात आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी व नागरिकांना त्यांच्या घराच्या परिसरात घंटागाडी आल्याची माहिती मिळावी, यासाठी आता उपाययोजना केल्या जात आहेत.

महापालिकेकडून नव्याने मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून, यामध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरात घंटागाडी आल्याची माहिती नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहे. हे अ‍ॅप नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

अँड्रॉईड मोबाईलवर हे अ‍ॅप वापरता येणार असून, त्यासाठी नागरिकांना स्वतःच्या घराचे लोकेशन सेट करावे लागणार आहे. तसेच नागरिकाचे नाव, मोबाईल नंबर टाकून ‘केवायसी’ प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्याची माहिती अ‍ॅपवर संग्रहीत होणार आहे. नागरिकाने दिलेल्या लोकेशनच्या परिसरात घंटागाडी आल्यावर संबंधित नागरिकाला मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून गाडी आल्याची माहिती मिळणार आहे. किती अंतरावर गाडी आल्यावर माहिती हवी आहे, तेही निश्चित करता येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/