पुण्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटानं अप्पर इंदिरानगर परिसर हादरला, 40 सिलेंडर एकाच ठिकाणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अप्पर इंदिरानगर येथे एका घरात ठेवण्यात आलेल्या एका सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात परिसर हादरला. या स्फोटानंतर घरात आग लागून त्यात एक जण जखमी झाला आहे. या ठिकाणी ४० गॅस सिलेंडर होते. सुदैवाने त्यातील केवळ एकच सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. अप्पर इंदिरानगर येथील व्हिआयटी कॉलेजच्या मागे एका घरात रात्री साडेअकरा वाजता मोठा स्फोट झाला.

हा स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे भुकंपासारखा हादरा लोकांना जाणवला. त्यामुळे लोक बाहेर आले़ त्यात या घराला आग लागल्याचे दिसून आले. घराची रस्त्याकडील संपूर्ण भिंत कोसळली. स्फोटासारखा आवाज ऐकून येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने येऊन पहिल्या मजल्यावरील ६ सिलेंडर बाहेर काढले. तसेच तळमजल्यावरही ८ सिलेंडर ठेवण्यात आले होते. येथे ४०गॅस सिलेंडर होते. ते भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम अशा दोन्ही कंपन्यांचे हे सिलेंडर होते.

एका ठिकाणी तेही दोन्ही कंपन्यांचे सिलेंडर कसे ठेवण्यात आले होते, असा प्रश्न पुढे आला आहे. अग्निशामक दलाच्या वतीने सांगितले की, ही दोन मजली इमारत असून सुमारे ४०० स्क्वेअर फुटाच्या दोन खोल्या होत्या. ओसवाल यांच्या मालकीच्या या घरात राजू हा भाडेकरु रहात आहेत. या घटनेत एक जण जखमी झाला आहे.