कर्वे नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, ४ जण भाजले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना कर्वे नगर येथील विकास चौकाजवळील भालेकर सदन येथे सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत तीन कामगार व एक लहान मुलगा जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात रवाना केले.

अनुप चव्हाण असे यातील एकाचे नाव आहे. यातील दोन जण गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्वे नगर येथील विकास चौक परिसरात शालीनी कॉर्नरजवळ भालेकर सदन नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर एका २० बाय १२ च्या हॉलमध्ये वडापाव, समोसे बनविणारे कामगार राहतात. ते तेथेच कामही करतात. या खोलीत झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास त्यांच्या खोलीतीस गॅस जोडलेल्या पाईपमधून गॅस लिक होण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी पहाटेच्या सुमारास एका कामगाराने एक शेगडी सुरु करून त्यावर बटाटे उकळण्यासाठी ठेवले. त्यावेळी अचानक मोठा स्फोट झाला.

हा स्फोट एवढा मोठा होता की, एक कामगार घरातून बाहेर फेकला गेला. तर खोलीतील इतर सामान विखुरले. त्यात खोलीतील तीन कामगार व एक लहान मुलगा असे चौघे जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाल्याने स्थानिकांनी तेथे गर्दी केली. त्यांनी कामगारांना व आतील एक सिलेंडर बाहेर काढले. अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us