गॅस सिलिंडर वापरताना ‘ही’ खबरदारी घ्या अन् टाळा दुर्घटना, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईसह परिसरात सिलिंडर स्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या स्फ़ोटामागील कारणांचा शोध घेतला असता त्यामध्ये केवळ निष्काळजीपणामुळे हे स्फोट होत असल्याचे अमोर आले आहे. सिलींडरवापराबाबत मुंबई महापालिका सूचना करत असते. साठा करू नका, असे आवाहन करत असते. मात्र याकडे कानाडोळा केला जातो. परिणामी, लालबाग किंवा अंधेरीसारखी एखादी दुर्घटना घडते आणि नाहक बळी जातात. महत्त्वाचे म्हणजे केवळ मुंबई महापालिका नव्हे तर अग्निशमन दलसुद्धा याबाबत जनजागृती करत असते.

सिलिंडर खरेदी करताना अधिकृत वितरकांकडून खरेदी करावा. गॅस लिकेजची खातरजमा करूनच गॅस सिलिंडर देणे हे गॅस वितरण कंपनीच्या प्रतिनिधीलादेखील बंधनकारक आहे. त्यामुळे सिलिंडर घेतानाच लिकेज नसल्याची खातरजमा करावी तपासणीवेळी लिकेज असल्याचे लक्षात आल्यास लगेचच सिलिंडर बदलून घ्यावा आदी सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत.

गॅसगळती : काय करावे ?
अचानक गॅसगळती झाल्यास आपणाला काय करावे हे सुचत नाही. घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही. गॅस गळती होत असल्याचे लक्षात येताच शटऑफ व्हॉल्व / रेग्युलेटर बंद करावे.
दरवाजे-खिडक्या उघडाव्यात,कोणतेही विद्युत उपकरण वा बटन बंद अथवा चालू करू नये.
शक्य असल्यास सिलिंडर जमिनीवरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवावा, गळती झाली असेल तेथून बाहेर पडून सुरक्षित जागी जावे, गळतीबद्दल गॅस कंपनीला व अग्निशमन दलास कळवावे. त्याच बरोबर बंदिस्त जागी सिलेंडर ठेऊन त्याचा वापर अथवा साठा करू नये. सिलिंडर आडवे ठेवल्यास लिकेज होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे कधीही चुकूनसुद्धा सिलिंडर आडवे ठेवू नयेत. सिलिंडरचा साठा करताना त्याची सेफ्टी कॅप लावलेली असणे आवश्यक आहे. सिलिंडरजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नये. गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी करताना अधिकृत व्यक्तीकडूनच करावी. एखादी बाब खराब आढळल्यास ती दुरुस्त करण्याऐवजी नवीन घ्यावी व तंत्रज्ञाच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करावी.

गॅस लिकेज डिटेक्टर : काय करावे ?
गॅस लिकेज डिटेक्टर बसवल्यास आपल्याला स्वयंचलित पद्धतीने गॅसगळती शोधून त्याची सूचना मिळते. त्यामुळे हे डिटेक्टर बसवून घ्यावे.परवानगीनुसार गॅस सिलिंडरचा साठा असलेल्या ठिकाणी, गॅस शेगडीच्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने गॅस लिकेज डिटेक्टर बसवावे.