महाड MIDC मधील कंपनीत वायु गळती, 7 कामगारांना बाधा

महाड : महाड एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स लिमिटेड या कंपनीत एच टू एस (हायड्रोजन सल्फाईड)या घातक वायुची गळती होऊन ७ कामगार बाधीत झाले. या ७ कामगारांना महाड शहरातील देशमुख हॉस्टिपलमधील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्यातील नायर या कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे.

उत्तम किसन पवार (वय ४९), तेजस विजय चाळके (वय २५, रा. आदे), जयराम चंद्रकांत चौधरी (वय २५, रा. वडघर), पंकज कुमार सोहम महातो (वय २५, रा. छपरा, बिहार), पप्पू कमल महातो (वय २५, रा. छपरा, बिहार), रजनीकांत नायर (वय ३४, रा. कर्वे आळी), दत्तात्रय रावसाहेब कोल्हे (वय ३९, रा. इंडो अमाइन्स कॉलनी) यांचा समावेश आहे.

या कंपनीत गुरुवारी सायंकाळी काम सुरु असताना अचानक हायड्रोजन सल्फाईड या मानवी आरोग्यास घातक असलेल्या वायूची गळती सुरु झाली. त्यामुळे तेथे असलेल्या कामगारांना त्रास होऊ लागला. काही जणांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे या कामगारांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तज्ञांना पाचारण करुन वायू गळती थांबविण्यात यश आले आहे. असे असले तरी संपूर्ण कंपनी बंद करण्यात आली असून कंपनीत कोणालाही आत जाऊ दिले जात नाही. कंपनीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.