फुग्याच्या गॅस टाकीचा स्फोट, चार जण जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी फुग्यामध्ये गॅस भरत असताना गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन त्यात एका महिलेसह चार जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी साडेपाच वाजता मॅरेथॉन स्पर्धा सुरु झाली. यावेळी स्पर्धेच्या मार्गावर डफरीन चौक येथे फुग्यामध्ये गॅस भरत असताना अचानक या गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. त्यात एक लहान मुलगा, महिला यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धा सुरु असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सोलापूरात रनर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या २ वर्षांपासून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा हे तिसरे वर्षे आहे. सुमारे साडेपाच हजार सोलापूरकरांना या स्पर्धेत भाग घेतला आहे. यंदा १२ परदेशी धावपटूही सहभागी झाली आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/