पेट्रोलच्या दराने घेतली पुन्हा उसळी; CNG गॅस दरात दीड रुपयांची वाढ

पुणे : पेट्रोलच्या दरात होणारी वाढ थांबायचे नाव घेत नाही. मंगळवारी पेट्रोलचे दर पुन्हा ३४ पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यात आता पेट्रोलचा दर ९३.४८ रुपये लिटर इतका झाला आहे़ डिझेल तब्बल ३६ पैशांची महागले आहे. पुण्यात डिझेलचा दर आजपासून ८२़३८ रुपये लिटर झाला आहे.

गेल्या महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर एक रुपयांनी वाढले होते. त्यानंतरही इंधनाच्या दरातील ही वाढ कायम राहिली आहे.५ फेब्रुवारी रोजी पेट्रोलच्या दरात ९३ रुपयांचा आकडा पार केला होता. त्यानंतर आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे.सीएनजी गॅस दरात आज अचानक दीड रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात यापूर्वी सीएनजी गॅस ५५.५० रुपये या दराने विकला जात होता. त्यांची किंमत आजपासून ५६.९५ रुपये इतकी झाली आहे.

डिझेलचे दर कमी असल्याने यापूर्वी अनेकांचा डिझेलवरील कार्स खरेदी करण्याकडे ओढा होता. या वाहनांची किंमत जास्त असली व त्यांच्या मेटेंनन्सचा खर्च थोडा अधिक पडत असला तरी पेट्रोलच्या मानाने डिझेलचा खर्च कमी असल्याने अशी वाहने परवडत असत. परंतु, आता डिझेल आणि पेट्रोलचा दर जवळपास सारखा आला असल्याने डिझेल वाहने घेतलेल्यांना त्याचा मोठा भुर्दंड पडू लागला आहे.