किडनी खराब होण्याचं ‘हे’ एक कारण

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – पोटाच्या समस्यांबाबत एक महत्वाचे कारण सांगितले जाते, ते म्हणजे गॅस. गॅसमुळे पोटाचे अनेक विकार होतात. वेळेवर जेवण न केल्याने तसेच चटपटीत पदार्थ खाल्ल्याने अनेकांना गॅसची समस्या भेडसावते तसेच सतत दारूचे सेवन करणाऱ्यांना देखील गॅसच्या त्रासला सामोरे जावे लागते.

या सर्व कारणांव्यतिरिक्त काही औषधांचे सेवन केल्याने देखील गॅसची समस्या जाणवते. अनेकदा पोटात जास्त गॅस झाल्याने छातीत दुखू लागते तसेच गॅसचे प्रमाण वाढल्यावर अनेकदा उलट्या सुद्धा होतात. अनेकदा लोक गॅसला किरकोळ समस्या समजून स्वतःच औषधे घेतात. गॅसवर उपाय म्हणून पेंटाप्राजोल,ओमिप्राजोल, लैंसाप्राजोल, इसोमेप्राजोल, रेबिप्राजोल अशा प्रकारची औषधे लोक स्वतः दुकानातून आणून घेतात.

परंतु या गोळ्या औषधांचा परिणाम तुमच्या किडनीवर सुद्धा होतो आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या गोळ्या आणि औषधे वारंवार घेत असाल तर तुमची किडनी देखील खराब होऊ शकते. याबाबत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) ने सर्व राज्यातील औषध विक्रेत्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये गॅसची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना औषधांवर एक इशारा देणारी सूचना लिहिण्यासाठी सांगण्यात आले आहे.

ड्रग कंट्रोलरला आता गॅसच्या औषधांमध्ये प्रोटॉन पंप इनहिबिटर्स चे प्रमाण किती आहे हे सांगावे लागणार आहे. कारण याचे जास्त प्रमाण किडनीसाठी हानिकारक आहे. या पत्रामध्ये गॅसच्या औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना औषधाच्या रॅपरवर याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो असे लिहिण्याचे आदेश दिले आहेत. आयपीसी या संस्थेच्या सल्ल्यानुसार हे पत्र पाठवण्यात आले आहे. ही संस्था औषधांपासून होणाऱ्या परिणामावर काम करते.लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अशा प्रकारच्या औषधांचे सेवन करावे हाच यामागचा हेतू आहे.

Visit : Policenama.com