विधायक ! गेट्स फाउंडेशनची मोठी घोषणा, ‘कोरोना’ व्हायरसविरूध्द लढण्यासाठी देणार 10 कोटी डॉलर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनने कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी 10 कोटी डॉलर देण्याची घोषणा केली आहे. तसेच वाशिंग्टनलाही 50 लाख डॉलर देण्याचा निर्णय घेतल्याचे बिल गेट्स यांनी सांगितले.

बिल गेट्स यांनी रेडिट या सोशल मीडिया साईटवर युजर्सच्या प्रश्नांना उत्तर देताना जनतेला शांतता राखण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तपासणीसाठी शहर आणि संस्था बंद करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या उपाय योजनेमुळे लोक घरातून बाहेर पडणार नाहीत आणि कोरोनाला अटकाव घालणे शक्य होईल.

गेट्स फाउंडेशन डायग्नोस्टिक्स, वैद्यकीय विज्ञान आणि लस तयार करणार्‍या लॅबसोबत काम करत आहे, अशी माहिती देऊन बिल गेट्स म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जगाला आर्थिक चिंता सतावते आहे. परंतु, याची सर्वाधिक झळ ही विकसनशील देशांना बसणार असून ते जास्त प्रभावित होऊ शकतात. हे देश श्रींमत देशांप्रमाणे सामाजिकदृष्ट्या दूर राहू शकत नाहीत. तसेच या देशांमध्ये रुग्णालयांची संख्या, आणि त्यांची क्षमता कमी आहे.

सामाजिक कार्यासाठी बिल गेट्स यांनी काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. परंतु कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचे ते सल्लागार म्हणून यापुढेही काम करणार आहेत. बिल गेट्स आता जास्त वेळ सामाजिक कार्यासाठी देणार आहेत. यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग सारखे विषय हाताळण्यावर भर देण्यात येणार आहे.

जगभरात मृतांची संख्या 8,900 पेक्षा जास्त :
गुरूवारी संपूर्ण जगातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 2,20,827 झाली आहे. 170 पेक्षा देशात कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. तर मृतांचा आकडा तब्बल 8,900 वर गेला आहे. या संसर्गातून जगभरात 85,121 लोक बरे देखील झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्या जगभरात कोरोनाची दहशत पसरली असून भारतातही कोरोनाच्या रूग्णांची वाढत आहे. सध्या देशात 171 कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत.