2 वर्षाच्या मुलासह महिला 17 व्या मजल्यावरून पडली खाली, दोघांचाही मृत्यू

नोएडा – गौतम बुद्ध नगरातील बिसरख पोलिस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुपरटेक इको व्हिलेज वनमध्ये 17 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे एक महिला आणि दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. सद्यस्थितीत घटनेचे नेमके कारण काय याबाबत माहिती मिळालेली नाही.

बालकनीतून महिला आणि मुल कसे पडले याचा पोलिस विचारपूस करत आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत महिला आणि मुलाचा मृत्यू झाला होता.

यापूर्वी शुक्रवारी संध्याकाळी गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजनगर विस्तार क्षेत्रात 14 व्या मजल्यावरून खाली पडून 5 वर्षाच्या निरागस मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

शेजार्‍यांनी घाईघाईने मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तेजस्वी चरण असे 5 वर्षाच्या मुलाचे नाव होते. तो गाझियाबादमधील एका शाळेचा विद्यार्थी होता. तो एलकेजी वर्गात शिकत होता. तेजस्वी आपल्या पालकांसह राजनगर विस्तार क्षेत्रातील पॉश सोसायटी व्हीव्हीआयपीच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होता.

यावेळी उपस्थित सोसायटीच्या एका महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची आई एक नर्स म्हणून काम करते, तर मुलाचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात. वडील सध्या कोरोना कालावधीत घरून काम करत आहेत.