शाहीद आफ्रिदीच्या ‘त्या’ आरोपांवर गौतम गंभीरचा पलटवार म्हणाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाहीद आफ्रिदीचे आत्मचरित्र ‘गेम चेंजर’ नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये त्याने अनेक विषयांवर खुलासे केले आहेत. आत्मचरित्रातून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्यावर आफ्रिदीने टीका आफ्रिदीने केली होती. गंभीरकडे व्यक्तीमत्व नाही. तो खूप अहंकारी आहे, अशी टीका आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रामध्ये केली आहे. त्याच्या या टीकेला गंभीरने सडेतोड उत्तर देत पलटवार केला आहे.

शाहिद आफ्रिदीला प्रत्युत्तर देताना गंभीर म्हणाला आहे की, ‘आफ्रिदी, तू केलेली टीका ही खूपच हास्यास्पद आहे. आम्ही अजूनही पाकिस्तानी नागरीकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही. आफ्रिदीलाही तो मिळेल आणि त्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी मी घेतो.’

गौतम गंभीरविषयी काय म्हणाला होता शाहिद आफ्रिदी
‘काही जणांशी खाजगी शत्रूत्व असतं तर काही जणांशी कामासंदर्भात. मात्र गंभीर त्याला अपवाद आहे. गंभीर एकदमच विचित्र आहे. गंभीर आणि त्याचा अहंकार याबाबत मी काय बोलणार ? गंभीरकडे व्यक्तीमत्व अजिबात नाही. उलट त्याच्या नावावर विक्रम कमी किंवा जवळपास नाहीतच, तो खूपच अहंकारी आहे. गंभीर एक खेळाडू म्हणून सतत नकारात्मक्ता घेऊन मैदानात वावरायचा. गंभीर हा डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉण्ड या दोघांचे मिश्रण आहे. अशा लोकांना आम्ही कराचीमध्ये सरीयल (सनकी) म्हणतो. मला आनंदी आणि सकारात्मक लोक आवडतात.

शाहीद आफ्रिदी आणि गौतम गंभीर वाद
कानपूरमध्ये २००७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात गंभीर आणि आफ्रिदीमध्ये वाद झाला होता. खेळांच्या नियमांचा भंग करुन मैदानात वाद घातल्याबद्दल आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावला होता. यासह इतरही काही सामन्यात गंभीर व आफ्रिदीत खटके उडाले होते. आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात अनेकदा मैदानावरही शाब्दीक चकमक झालेली पाहायला मिळाली आहे. आता इतक्या वर्षांनंतरही या दोन खेळाडूंमध्ये मैदानाबाहेरही वाद सुरूच आहे.