जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर – मेहबूबा मुफ्ती यांच्यात ‘ट्विटरवॉर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० वरून भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टीचा सदस्य गौतम गंभीर आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख तसेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यामध्ये ट्विटरवॉर झालं. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले.

फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर लोकसभा निवडणुकीसाठी बंदी घालावी या याचिकेवरून मेहबुबा मुफ्तींनी भाजपवर टीका केली होती. ‘न्यायालयाचा वेळ फुकट का घालवता ? भाजपकडून कलम ३७० रद्द होण्याची वाट बघा. कलम ३७० रद्द झाल्यानंतर आम्ही लोकसभा निवडणूक लढणार नाही. कारण मग भारताचं संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू होणार नाही. भारतीय नागरिकांनो तुम्हाला हे कळत नसेल, तर तुम्ही नष्ट व्हाल’, असं ट्विट मेहबुबा मुफ्तींना केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत ‘हा भारत आहे. नष्ट व्हायला तुमच्यासारखा डाग नाही,’ असा रिप्लाय गौतम गंभीरने मेहबुबा मुफ्तींना दिला.

गौतम गंभीरचा हा रिप्लाय पाहून ‘तुझी भाजपमधील कारकिर्द तुझ्या क्रिकेट कारकिर्दीएवढी वाईट ठरणार नाही, अशी अपेक्षा मी करते’, असं ट्विट खवळलेल्या मेहबुबा मुफ्तींनी केलं.

माझ्या ट्विटला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला १० तास लागतात. हे आपल्या व्यक्तिमत्त्वात खोलीची कमतरता दर्शवते. अडचणी सोडवण्यासाठी आपण संघर्ष केला आहे यात आश्चर्य नाही. असा टोला गंभीर याने मुफ्तींना लगावला.

मला तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी आहे. आपल्याला कश्मीरबद्दल काहीच माहिती नाही. मी तुम्हाला ब्लॉक करत आहे. आपण २ रुपये प्रतिट्वीटच्या हिसाबने दुसरीकडे ट्रोलिंग करू शकता.’

या सगळ्या ट्विटरवॉरनंतर मेहबुबा मुफ्तींनी गौतम गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केलं आणि वादावर पडदा पडला.