‘त्या’ प्रकरणी गौतम गंभीरचा अरविंद केजरीवालांवर अब्रुनुकसानीचा खटला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि दिल्लीतील आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गौतमवर गंभीर आरोप केला आहे. गौतम गंभीर निवडणूक जिंकण्यासाठी माझ्याविरोधात पत्रकं वाटत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. गौतम गंभीर भाजपकडून, तर आतिशी आपकडून पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात निवडणूक मैदानात आहेत. या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, पत्रके वाचताना देखील आम्हाला लाज वाटते, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोण कसं प्रचार करू शकतं. गौतम गंभीर देशासाठी खेळताना जेव्हा चौकार आणि षटकार मारायचे तेव्हा आम्ही टाळ्या वाजवायचो. मात्र आम्हाला वाटलं नव्हतं कि इतक्या खालच्या पातळीवर ते प्रचार करू शकतात.

काय आहे या पत्रकात ?

संबंधित पत्रकांमध्ये आप नेत्या आतिशी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या आईविरोधात अश्लील आणि अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आतीशी यांनी म्हटले आहे कि, माझ्यासारख्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी तुम्ही इतकी खालच्या दर्जाची भाषा वापरता, तर निवडून आल्यावर मतदारसंघातील महिलांच्या सुरक्षेचे काय.?

‘आरोप सिद्ध झाल्यास उमेदवारी मागे घेईल’

यावर गौतम गंभीर यांनी आरोपांना उत्तर देताना आतिशी यांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच जर आतिशी यांनी त्यांचे आरोप सिद्ध केले, तर मी माझी निवडणूक उमेदवारी मागे घेईन, असे मत त्यांनी व्यक्त केले. गंभीर यांनी या आरोपांनंतर ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, गंभीर यांनी आतिशी यांच्यासह अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे कि,“उलटा चोर कोतवाल को डाँटे?”.

महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस 

दरम्यान, या प्रकरणात दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या पत्रकांना लज्जास्पद म्हटले. तसेच हा प्रकार एका महिला उमेदवाराच्या चारित्र्यावर आणि सन्मानावर हल्ला आहे, असेही मालीवाल म्हणाल्या.