भाजपा खा. गौतम गंभीर यांच्या वडिलांची आलिशान कार लॉकडाऊनमध्ये चोरीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे चोर्‍या तसेच वाहन चोर्‍यांमध्ये मोठी घट झाली आहे. असे असताना भाजपाचे खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्या वडिलांची आलिशान फॉच्युनर कार चोरीला गेली आहे. दिल्लीतील राजींदरनगर परिसरात गौतम गंभीर यांचे वडिल दीपक गंभीर यांचा बंगला आहे. बंगल्याबाहेर पार्क केलेली पांढर्‍या रंगाची फॉच्युनर कार चोरट्यांनी काही मिनिटात चोरुन नेली.

शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. खासदारांच्या वडिलांची आलिशान कार चोरीला गेल्याचे समजताच दिल्ली पोलिसांची धावपळ वाढली. पोलीस उपायुक्त संजय भाटिया हे प्रत्यक्ष घटनास्थळी आले. चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे भाटिया यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात थेट खासदाराची कार चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आलीशान कारमध्ये फॉच्युनर कार चोरण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुणे, मुंबईतही चोरटे स्वत: कारमधून येऊन अवघ्या १० मिनिटांच्या आत फॉच्युनर कार चोरुन नेत असल्याचे आढळून आले आहे. या कार राजस्थानमध्ये पाकिस्तान सीमेवर अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात असल्याचे यापूर्वीच्या तपासातून उघड झाले आहे.