गौतम पाषाणकर यांनी बेपत्ता होण्यापूर्वी ATM मधून काढले होते पैसे, फोनमधील डेटाही केला Delete !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) हे बुधवारी (दि 21) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर त्यांची सुसाईट नोट सापडल्यानं खळबळ उडाल्याचं चित्र दिसून आलं. आता त्यांच्याबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) रस्त्यावरील एका एटीएममधून (ATM) त्यांनी बेपत्ता होण्याआधी 5000 रुपये काढले होते. तसंच आपल्या फोनमधील सर्व डेटा डिलीट केला होता अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे.

बुधवारी सायंकाळपासून गौतम पाषाणकर बेपत्ता असल्यानं त्याचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Chowky) तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पोलीस तपासात गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट (Gautam Pashankar Suicide note) हाती लागली होती. व्यवसायातील आर्थिक नुकसानीमुळं आत्महत्या करत असल्याचं यात लिहिण्यात आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी गौतम यांनी लोणी काळभोर येथे भेट दिली होती. त्यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास ते जंगली महाराज रोडवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्या ड्रायव्हरनं अनेकदा कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. यानंतर ड्रायव्हरनं गौतम यांचा मुलगा कपिल याच्याशी संपर्क साधला. कुटुंबीय गौतम यांना शोधण्यात अपयशी ठरल्यानंतर कपिल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

पोलीस तपासात चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईड नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसांपासून व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळं आत्महत्येचं पाऊल उचलत असून कोणालाही जबाबदार धरू नये असं त्यांनी लिहिलं आहे. यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणी तपासाचा वेग वाढवला आहे. विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना त्यांनी एटीएममधून पैसे काढल्याची आणि फोनमधील डेटा डिलीट केल्याची माहिती समोर येत आहे.