जनतेसाठी खासदारकी फुकली ! आता ‘वन मॅन शो’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन वाद सुरु झाल्यानंतर अखेर उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरसकट सर्वांचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, जनतेसाठी खासदारकी फुकून टाकली, आता वन मॅन शो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित वादग्रस्त पुस्तक मागे घेतले नसेल तर ते मागे घ्यायला लावू, संबंधितांवर कारवाई करायला लावू अशा आपल्या स्टाइलमध्ये उदयनराजे यांनी समाचार घेतला.

उदयनराजे यांनी यावेळी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर देखील बरसले. माझ्या बुद्धीला जे पटत नाही, ते मी करत नाही. त्यामुळेच निवडून आल्यानंतरही खासदारकीचा राजीनामा दिला. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. माझं नातं सर्वसामान्य लोकांशी आहे. त्यांच्यासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे. आम्ही काय करायचं हे इतरांनी सांगू नये.

यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी सवाल उपस्थित केले की शिवसेना भवनात बाळासाहेबांचा फोटो शिवरायांच्या वर का? पक्षाला शिवसेना नाव दिलं, तेव्हा शिवरायांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? महाशिवआघाडीतून शिव शब्द का काढला? सोयीप्रमाणे राजकारण करायची ही यांची लायकी. शिववडा नावाचा वडापाव सुरु केला, शिवाजी महाराजांचे नाव वडापावला कसं देता? आम्ही शिवसेना नावाला कधी हरकत घेतली नाही. शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करावं.

यावेळी उदयनराजे यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. उदयनराजे म्हणाले की जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. अनेकांना जाणता राजाची उपमा दिली जाते. त्यांचा मी निषेध करतो. जाणता राजा उपमा देताना विचार करण्याची गरज आहे.

फेसबुक पेज लाईक करा –