आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी गीता गोपीनाथ यांची निवड 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ असून हा मान भारतीय महिलेला मिळालेला आहे. गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) मुख्य अर्थतज्ज्ञपदी रूजू झाल्या आहेत. गीता गोपीनाथ या म्हैसूरमध्ये जन्मलेल्या आणि सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात शिकविणाऱ्या अर्थतज्ज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही बजावले असून ही मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
जगातल्या विविध देशांचे डॉलरमध्ये होणारे व्यवहार व त्याचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर होणारा परिणाम, डॉलरची चणचण भासल्यास आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर होणार परिणाम आदी गोष्टी आपल्या अभ्यासाचे विषय असतील  गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थकारणात व व्यापारात डॉलर या चलनाच्या असलेल्या अनभिषिक्त स्थानाचं कारण समजावून घेण्यामध्ये आपल्याला रस असल्याचं  त्यांनी स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून गौरवोद्गार –
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एक ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचे व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड अनुभव असल्याचे गौरवोद्गार काढले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये त्यांनी चांगले नेतृत्वगुण दाखवले असून त्या जगभरातील महिलांसाठीही एक आदर्श असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले आहे.
 गीता गोपीनाथ यांच्याबद्दल –
गीता यांचे वडील टी. व्ही. गोपीनाथ  उद्योजक आहेत. गीता यांचे शिक्षण राजधानीतील लेडी श्रीराम महाविद्यालय ( बीए ),  दिल्ली स्कूल ऑफ इकॉनामिक्स (एमए)  येथे झाले आहे.  गीता यांचे पती इक्बालसिंग धाडीवाल हेही अर्थतज्ज्ञ आहेत आणि ते आयएएस परीक्षेत चमकले होते.  ४६ वर्षांच्या असणाऱ्या गीता या आयएमएफमध्ये हे पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. १९९० मध्ये चंद्रशेखर सरकार असताना भारतावर सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती. ते वाचताना धक्का बसलेल्या गीता यांनी अर्थतज्ज्ञ होण्याचे निश्चित केले आणि भारतातील शिक्षण संपल्यावर प्रिन्स्टन विद्यापीठात डॉक्टरेट केली. काही दिवसांपूर्वी डाव्या केरळ सरकारने गीता यांना अर्थसल्लागार म्हणून नेमले, तेव्हा स्वाभाविक वादळ उठले. याचे कारण, गीता या वेगवान आर्थिक सुधारणांच्या पक्षाच्या आहेत. मोदी सरकार वेगाने आर्थिक सुधारणा करत नाही, अशी टीका त्या अनेकदा करतात.  अनेक विषयांवरचे ४०हून अधिक शोधनिबंध गीता यांच्या नावावर आहेत. २०१४ मध्ये जगातील निवडक २५ तरुण अर्थतज्ज्ञांमध्ये गीता यांची निवड झाली होती.
सध्या जागतिकीकरणाला हादरे बसत असून अनेक देश संकुचित विचारसरणीला जवळ करत असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी ही आव्हानात्मक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर गोपीनाथ यांची नियुक्ती महत्त्वाची मानण्यात येत आहे.