‘मराठ’मोळे मनोज नरवणे यांनी स्वीकारला लष्कर प्रमुख पदाचा ‘पदभार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत आनंददायी आहे कारण नरवणे हे महाराष्ट्रीयन आहेत. मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी आज विराजमान होणार आहे. त्यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत हे आज ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याजागी नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) म्हणून विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केंद्र सरकारकडून करण्यात होती आता त्यांची जागा नरवणे यांनी घेतली आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे मूळचे पुण्याचे रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सदाशिव पेठ येथे ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. त्यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती ही आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून केले. नंतर जून १९८० मध्ये ते ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात सामील झाले. आणि तेथूनच त्यांचा खऱ्या अर्थाने प्रवास चालू झाला.

‘७ सीख लाइट इन्फंट्री’ मधून लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व करत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी आजवर अनेक पदांची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांनी आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’ म्हणून काम पाहिले. तसेच स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’ म्हणून देखील जबाबदारी पार पाडली तसेच लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू येथील लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणून अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आपल्या कौशल्याने आपले वेगळेपण सिद्ध केले असून त्यांच्या अशा कामगिरीमुळे त्यांची वेळोवेळी दखल घेण्यात आली. विशेष म्हणजे नरवणे यांचे वडील देखील हवाई दलात कार्यरत होते. त्यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. तसेच त्यांच्या आई देखील प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पत्नी वीणा नरवणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/