‘मास्क’ घालणाऱ्यांनाच मिळणार पेट्रोल-डिझेल, ‘या’ ठिकाणच्या ‘पेट्रोलडिलर’ संघटनेचा ‘निर्णय’

ओडिशा : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस विरोधात देशव्यापी युद्ध सुरु आहे. लॉकडाऊन बरोबरच नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात येत आहे. आता ओडिशामध्ये देखील नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जे मास्कचा वापर करणार नाहीत अशा लोकांना राज्यातील कोणत्याही पंपावर पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही, अशी माहिती राज्यातील उत्कल पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय लाठ यांनी दिली आहे. लोकांचा कोरोना व्हायरस पासून बचाव करायचा असेल तर असे कठोर निर्णय घ्यावे लागतील असा विश्वास असोसिएशनला आहे.

मास्क घातले नाहीतर होणार दंड
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालण्यास प्राधान्य दिले जात आहे. घरातून बाहेर पडताना मास्क घालणे बांधनकारक करण्यात आले आहे. मास्कचा वापर केला नाही तर दंड वसूल करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. राज्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

उत्कल पेट्रोलियम डीलर्स असोसिएशने सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. तसेच मास्क न घालणाऱ्यांना पेट्रोल किंवा डिझेल न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, पंपावर मास्क घालून येणाऱ्यांनाच पेट्रोल किंवा डिझेल देण्यात येईल अन्यथा पेट्रेल किंवा डिझेल देण्यात येणार नाही. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगार आणि ग्राहकाच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संजय लाठ यांनी सांगितले.

संजय लाठ म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून सरकारच्या निर्णयाचे पालन करणे आणि त्याबाबत लोकांना सतर्क करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत संघटनेने हा निर्णय घेतला आहे. यापुढे मास्क न घालता पंपावर आल्यास त्या व्यक्तीला पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही.