Ram Mandir Chanda : राम मंदिरासाठी भक्तांनी उघडला खजिना ! 1100 कोटींचे होते लक्ष्य, दान मिळाले 2100 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्यामध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेले 44 दिवसांचे दान अभियान 27 फेब्रुवारी, शनिवारी पूर्ण झाले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्यानुसार, या अभियानात शुक्रवारपर्यंत 2100 कोटी रुपयांचे दान मिळाले. विशेष म्हणजे 15 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानाचे लक्ष्य 1100 कोटी रुपये होते. 2100 कोटी रुपयांची रक्कम आता आणखी वाढेल, कारण रक्कम मोजण्याचे काम सुरू आहे. स्वामी गोविंद देवगिरी यांनी हे सुद्धा सांगितले की, आता परदेशात राहणारे रामभक्त त्यांच्याकडे सुद्धा दान जमवण्याचे अभियान सुरू करण्याची मागणी करत आहेत. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या आगामी बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल.

राम मंदिर निधी समर्पण अभियान 15 जानेवारी 2021 ला मकर संक्रांतीला सुरू करण्यात आले. यासाठी 27 फेब्रुवारी 2021 म्हणजे संत रविदास जयंती पर्यंतचा वेळ ठरवण्यात आला होता. या 44 दिवसात 5 लाख गावांपर्यंत जाण्याचे लक्ष्य होते. यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपयांचे कुपन जारी केले होते. सर्वात जास्त 100 रुपयांची 8 कोटी कुपन छापली होती. मात्र, लवकरच ही कुपन कमी पडली.

राष्ट्रपतींपासून झाली होती दान अभियानाची सुरूवात
राम मंदिरासाठी दान अभियानाची सुरुवात 15 जानेवारीपासून झाली होती आणि पहिले दान देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून घेण्यात आले होते. राष्ट्रपतींनी 5 लाख रुपयांचे दान दिले होते. यानंतर मोठ्यात मोठे दान देण्याची स्पर्धा सुरू झाली होती. यामध्ये मध्य प्रदेशातील दोन भाजपा आमदारांचा सुद्धा समावेश आहे. हे होते कटनीच्या विजयराघवगढ मतदार संघाचे आमदार संजय पाठक आणि रतलामचे आमदार चेतन कश्यप.