Maratha Reservation : संभाजी ब्रिगेडचा MVA सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसने; CM ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावरून संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसणे असे म्हणत मुख्यमंत्र्यांना बारामतीची हवा जरा जास्तच मानवलेली दिसतेय असे टीकास्त्र खेडेकर यांनी सोडले आहे.

सौरभ खेडेकर मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. खेडेकर म्हणाले की, मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण पत्राद्वारे केली आहे. 3 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या पर्यायाविषयी सूतोवाच केले होते. मात्र, आता हा पर्याय पूर्णपणे बाजूला सारला गेला आहे. अजित पवार यांनी मराठ्यांचा घात करु नये, असे खेडेकर यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. गायकवाड आयोग स्वीकारुन सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे. त्या पर्यायाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोट दाखवून हात झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही अशा बाळासाहेबांचे आपण वारस आहात. परंतु सध्या बारामतीची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसत आहे, असे म्हणत खेडकेर यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.