5 एप्रिल रोजी फक्त लाईटचे ‘दिवे’ बंद करा ! ‘TV-AC-फ्रीज’ नाही, मोदी सरकारनं दूर केल्या सर्व ‘शंका’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, त्यामुळे 9 मिनिटे एकाचवेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो.


एकाचवेळी लाईट बंद केल्यानंतर आणि चालू केली तर याचा परिणाम ग्रीडवर पडू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी असेही म्हटले जातेय की कमी व्होल्टेजमुळे टीव्ही, फ्रीज आणि पंखे खराब होऊ शकतात. मात्र, आता ऊर्जा मंत्रालयाने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. तसेच असे काहीही होणार नाही, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

टीव्ही, फ्रीज नाही तर फक्त घराची लाईट बंद करा
ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील लाईट बंद करण्याचे अपील केली आहे. परंतु विद्युत उपकरणे बंद करण्यास सांगितलेले नाही. तसेच यावेळी पथदिवे सुरु राहणार आहेत. जेणेकरून सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही. पथदिवे सुरु ठेवण्याचे राज्य सरकारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

यूपीमध्ये विद्युत मंडळाने केली ही व्यवस्था
दरम्यान, यूपीमध्ये विद्युत मंडळाने एक निर्णय घेतला आहे. 5 एप्रिल रोजी रात्री 8 ते 9 या दरम्यान टप्प्याटप्प्याने लोडशेडिंग करण्यात येणार आहे. जेणेकरून राज्यातील लोक रात्री 9 वाजता एकाच वेळी लाईट बंद करतील आणि 9 मिनिटानंतर पुन्हा लाईट सुरु करतील त्यावेळी ग्रीडवर लोड येणार नाही. अशा प्रकारचे आदेश संबंधितांना राज्य सरकारने दिले आहेत. उत्तर प्रदेशातील लोड डिस्पॅच सेंटरच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी अचानक 3000 मेगावॅटच्या लोडमध्ये कपात होऊ शकते.

त्या 9 मिनिटासाठी ऊर्जा मंत्रालय दक्ष
शुक्रवारी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. एकाचवेळी लाईट बंद केल्यामुळे ग्रीडवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जरी ग्रीमध्ये कोणतीही समस्या आली नाही तरी देखील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व पर्यायी व्यवस्था तयार ठेवली पाहिजे असे बैठकित सांगण्यात आले. दरम्यान लॉकडाऊनमुळे देशात यापूर्वीच विजेची मागणी कमी झाली आहे. 5 एप्रिल रोजी ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.