George Floyd Death Case: ‘अमेरिकेतील’ हिंसात्मक परिस्थितीत अजून ‘वाढ’, 67 हजार नॅशनल गार्ड तैनात

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा पोलिसांहाती मृत्यू झाल्यानंतर होत असलेल्या हिंसक निषेधांमुळे देशातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सुमारे सहा राज्य आणि 13 प्रमुख शहरांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली गेली आहे. नॅशनल गार्डचे 67 हजार सैनिक देशभरात तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकेत इतक्या मोठ्या संख्येने सैन्य कधीही तैनात करण्यात आले नव्हते.

फ्लॉयडच्या हत्येप्रकरणी देशभरातील निदर्शकांमध्ये कमीतकमी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे चार हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय 40 शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी हिंसाचार आणि दरोडेखोरीच्या घटनांमुळे न्यूयॉर्क शहरात कर्फ्यू लादला आणि पोलिसांची उपस्थिती वाढविली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी फ्लॉयडच्या मृत्यूविरोधात हिंसक निषेध रोखण्यासाठी शहर व राज्यांना आवश्यक पावले उचलली नाहीत तर सैन्य तैनात करण्याची धमकी दिली आहे. व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डन येथे ते म्हणाले की दंगली, लूटमार, तोडफोड, हल्ले आणि संपत्तीचा अनावश्यक तोटा रोखण्यासाठी आपण हजारो सशस्त्र सैनिक, लष्करी कर्मचारी आणि कायदा अंमलबजावणी अधिकारी पाठवणार आहोत.

कोट्यावधी मालमत्तेचे नुकसान

एका आठवड्यापासून अमेरिकेतील निदर्शनांमध्ये आतापर्यंत कोट्यावधी डॉलर्सची संपत्ती वाया गेली आहे. निदर्शकांनी फ्लॉयडच्या मृत्यूबद्दल व्यावसायिक केंद्रे व सार्वजनिक स्थळांचे नुकसान केले असून दुकाने व मॉल्सची लूट केली. त्याच वेळी अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, ‘आज मी प्रत्येक राज्यपालांना रस्त्यांवर पुरेशा प्रमाणात राष्ट्रीय गार्ड तैनात करण्याची शिफारस केली आहे. हिंसाचार संपेपर्यंत महापौर आणि राज्यपालांना कायदा अंमलबजावणी संस्था किंवा अधिकाऱ्यांची मजबूत उपस्थिती सुनिश्चित करावी लागेल.’

यूएस आर्मी तैनात करणार: ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले की जर एखादे शहर किंवा राज्याने तेथील रहिवाशांचे जीवन व संपत्ती जपण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास नकार दिला तर मी अमेरिकन सैन्य तैनात करेन आणि त्यांच्यासाठी लवकरच या समस्येचे निराकरण करीन. ते म्हणाले की, अलिकडच्या काळात देश व्यावसायिक अराजक घटक, हिंसक जमाव, जाळपोळ, दरोडेखोर, दंगलखोर, अँटिफा आणि इतरांच्या तावडीत आहे.