आत्मनिर्भर भारत : ज्या कामासाठी जर्मन कंपनीनं मागितले 50 लाख, तेच काम आपल्या इंजिनिअर्सनी केलं 1.5 लाखात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने आणि संपूर्ण जगभरात लॉकडाऊन असल्याने बाहेरुन येणारा कच्चा माल देशात येऊ शकला नाहीत. त्यातच गलवानमध्ये चीन-भारत देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा करत अनेक उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर अनेक वस्तू आपल्या देशात बनू लागले आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशातील ऑर्डिनेंस फॅक्टरी कटनी (OFK) च्या इंजिनिअर्सनी एक इतिहास रचला आहे.

ओएफकेच्या इंजिनियर्सनी एके-47 आणि इंसास रायफलच्या बुलेटच्या ग्लिडिंग मेटल कप (खोका) बनवणारी मशीन दुरुस्त करून नवीन इतिहास रचला आहे. या मशीनची दुरुस्ती यापूर्वी परदेशातील कंपनीकडून केली जात होती. केवळ या मशीनच्या दुरुस्तीसाठी जर्मनीच्या कंपनीनं तयारी दर्शवली होती आणि या कमासाठी कंपनीने 50 लाख रुपयांची मागणी केली होती. जर्मन कंपनीच्या मागणीनंतर ओएफकेच्या इंजिनियर्सनी पुढाकार घेतला आणि एक वर्षापासून बंद असलेली मशीन तीन महिन्यात अवघ्या दीड लाख रुपयात दुरुस्त केली. आता दोन्ही शस्त्रांच्या मागणीनुसार उत्पादन केले जाणार आहे.

याचे विशेष म्हणजे याला लागणारे स्पेअर पार्टस् आयात करण्यात आले नाहीत. तर ओएफकेच्या इंजिनिअर्सनी स्थानिक स्तरावर ते तयार करुन वापरले आणि मशीन सुरु केली. तसेच त्यांनी मशीनचा ड्राईव्ह ईलेक्ट्रॉनिकवरून बदलून म्यॅन्युअल केला. या संदर्भात ओएफकेचे महाप्रबंधक वीपी मुंघाटे यांनी सांगितले, की ही मशीन एक वर्षापासून बंद होती. स्थानिक इंजिनियर्सनी त्याची दुरुस्ती केल्यानंतर इंसास रायफलच्या बुलेटसाठीचा 5.56 ग्लिडिंग मेटल आणि एके-47 ग्लिडिंग मेटल कप तयार केली जाणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ओएफकेच्या टीमचा महत्त्वाचा वाटा आहे.