विधानसभा 2019 : कसब्यात खा. गिरीश बापटांचा ‘कल’ महत्वाचा, ‘त्यांचं’ आमदारकीचं स्वप्न पूर्ण होणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – गिरीश बापट यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणुक लढविली आणि विजयी झाल्याने तब्बल २५ वर्षांपासून आमदारकीची स्वप्न पाहाणार्‍या भाजपमधील इच्छुकांच्या इच्छांना धुमारे फुटले आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघातून भाजपकडून अनेकजण इच्छूक आहेत. तर विरोधी पक्ष कॉंग्रेसकडूनही काही दिग्गजांनी तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत स्पर्धा सुरू असून उमेदवार कोण असेल ? यावरच बालेकिल्ल्याचे यशाअपयश अवलंबून राहाणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये पश्‍चिमेकडील शनिवार, नारायण, सदाशिव, नवी पेठ हा परिसर महापालिका निवडणुकीतही अपवाद वगळता पुर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला राहीला आहे. तर शिवाजी रोड पलिकडील पुर्व भागातून कायमच कॉंग्रेसला साथ मिळाली आहे. मागील महापालिका निवडणुकीमध्ये चार सदस्यीय प्रभाग आणि केंद्र व राज्यातील सत्येचा जोरावर अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देत भाजपने पुर्व भागात बर्‍यापैकी शिरकाव केला आहे. तर खासदार गिरीश बापट यांच्या पुर्वीपासूनच्या बेरजेच्या राजकारणाचा वापर करत सलग पाचवेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. बापट हे खासदार झाल्याने भाजपकडून तब्बल २५ वर्षांनी नवीन चेहेरा रिंगणात उतरणार आहे, हे जवळपास निश्‍चित आहे. यामध्ये महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक गणेश बीडकर, हेमंत रासने, धीरज घाटे यांची नावे अग्रभागी आहेत. बापट यापैकी कोणाच्या बाजूने कौल देणार त्याचा विजय निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसचही या मतदारसंघामध्ये बर्‍यापैकी ताकद आहे. मागील निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर राहीलेले रोहीत टिळक यांनी यंदा निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. तर मनसेकडून निवडणूक लढविणारे व २००९ मध्ये बापट यांना कडवी झुंज देणारे रविंद्र धंगेकर यांनी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सर्वसामान्य नागरिकांची ताकद आणि प्रतिकूल परिस्थितीत पाचव्यांदा नगरसेवक पद राखणारे धंगेकर यांनी सलग तिसर्‍यांदा विधानसभा निवडणुकीसाठी मोट बांधली आहे. तसेच कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनीही कसबा मतदारसंघातून उमेदवारीसाठी जोर लावला आहे. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठीही खूप प्रयत्न केले होते. महापालिकेतील अभ्यासू नेतृत्व आणि केवळ दहा नगरसेवक असताना १०० नगरसेवक असलेल्या भाजपला अभ्यास आणि वक्तृत्वाच्या जोरावर वेळोवेळी अडचणीत आणत शिंदे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहीले आहेत. कॉंग्रेसचे हे दोन्ही उमेदवार भाजपच्या उमेदवारापुढे आव्हान उभे करतील, असे तरी वरकरणी दिसून येत आहे.

मध्यवर्ती शहरातील शिवसेना आणि मनसेची काही मर्यादीत भागात असून घोरपडे पेठ, गंज पेठ, गणेश पेठ, भवानी पेठ तसेच दांडेकर पुल, दत्तवाडी परिसरात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा काही प्रमाणात मतदार आहे. भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशी सरळसरळ लढत झाल्यास शिवसेना, मनसे व अन्य पक्ष कोणाच्या पारड्यात मते टाकणार हे भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारावर ठरणार आहे. सध्या राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी गळती लागली आहे. विधानसभा निवडणुक लढविण्याबाबत मनसेचेही तळ्यात मळ्यात सुरू आहे. ही स्पेस भरून काढणारा आणि जनतेला विश्‍वासू वाटणारा विरोधी पक्षाचा उमेदवार कोण आहे, यावरूनही या मतदारसंघामध्ये मतांचे धु्रवीकरण होईल, असे सध्यातरी दिसते.

भाजपने मतदारसंघ निहाय सर्वेक्षण सुरू केले असून त्यानंतर उमेदवारी निश्‍चित केली जाणार आहे. पर्वती मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदार राहीलेल्या माधुरी मिसाळ यांची शहरअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातील सद्यस्थिती पाहाता मिसाळ यांना कसब्यातून उमेदवारी देउन पर्वतीमध्ये नवा चेहेर्‍याची चाचपणी केली जात आहे. असे झाल्यास कसबा मतदारसंघातील सर्व गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Visit : policenama.com