सोमेश्वरमध्ये लेकींचा लक्षवेधी उत्सव

अंबाजोगाई  : पोलीसनामा ऑनलाइन – घाटनांदुर येथील सोमेश्वर कन्या प्रशालेत माजी विद्यार्थींचा लक्षवेधी, भव्य व अभिनव यशस्वीनी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सोमेश्वर कन्या प्रशालेत १९८८ ते २००० दरम्यान शिक्षण घेतलेल्या व राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवारत असणाऱ्या घाटनांदूरसह सुमारे २० गावातील चारशे मुलींशी संपर्क करण्यात आला होता. या मेळाव्यात ग्रहिणी, रानावनात काम करणाऱ्या व मजुरी करणाऱ्या मुलींनाही आवर्जुन निमंत्रित करण्यात आले होते.

यशस्वीनी मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे अडीचशे मुलींना फेटे बांधुन बँडबाजा, फटाके, तोफा, औक्षण व रांगोळ्यासह घाटनांदूर गावात दिमाखदार व लक्षवेधी मिरवणुक काढण्यात आली. यावेळी आजी विद्यार्थीनींनी लेकींवर पुष्पवृष्टी केली. याप्रसंगी लेकींनी फुगडीचा फेर धरुन नृत्यही सादर केले. उद्घाटन, सत्कार, परिचय, संस्मरणीय आठवणी, गप्पांचा कट्टा अशा अनेक सत्रात संपन्न झालेल्या यशस्वीनींच्या उत्सवात मुली ऋणानुबंधाचे नाते जपण्यासाठी जिव्हाळ्यासह उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. उपस्थित मुलींनी संस्थापदाधिकारी, विद्यमान व सेवानिवृत्त  शिक्षक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सत्कार  केला. अनिता लालचंद राजपुत हीने भर पेहरावाची भेट दिली. यावेळी माजी लेकींनी शाळेला प्रतिमा, झाडे, फळे आदी विद्यार्थीनीपयोगी वस्तुसह आर्थिक योगदानही दिले. सहभागी सर्व मुलींचा सन्मानचिन्हासह सत्कारही करण्यात आला. मेळावा आयोजनासाठी अनेक समित्या निर्माण करण्यात आल्या होत्या. यशस्वीनींच्या उत्सवात अनेक लेकींची भेट-गाठ २० ते ३० वर्षानंतर झाल्याने अनेकांना आश्रु अनावर झाले होते. या मेळाव्याचे शैलीदार सुत्रसंचलन शोभा निलंगे व सपना पाथरकर यांनी केले.

रौप्यमहोत्सवी सोमेश्वर कन्या प्रशालेतील यशस्वीनी मेळाव्यास श्री अजितदादा देशमुख, मदनसिंह कोकणे, महेशअप्पा शेटे, एस. जी. स्वामी, आर. पी. मुळे, प्राचार्य व्ही. एस. शिदे आदी मान्यवर उपस्थित होते तर लेकींची उत्सव अद्भुत, दिमाखदार व  यशस्वीपणे संपन्न व्हावा यासाठी मुख्याध्यापिका श्रीम. सी. ए. देशमुख, पर्यवेक्षक जे. एम. सय्यद, श्रीम. एस. बी. खंडाळे, दि. ना. फड, श्रीम. व्ही. बी. तेलंग, एफ. एफ. शेख, डॉ. प्रज्ञा पाटील, सविता बुरांडे, अनिता देशमुख, रंजना कराड, उर्मिला सिरसाठ, शुभांगी शेटे, सरीता पुरी, सिता काबरे, संगिता अरसुडे, बेबी शेख,  शुभांगी महाजन, मंजुषा शेटे आदींसह सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसह माजी विद्यार्थीनीही परिश्रम घेतले.