नगरमधून घनश्याम शेलार सेनेचे उमेदवार?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मला दिल्याचे स्पष्ट संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, असा दावा आज सायंकाळी घनश्याम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

भाजप-सेना युतीत ही जागा भाजपकडे राहते. मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपाचे आहेत. असे असताना शेलार यांनी उमेदवारीचा दावा केल्याने नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हेही उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे आम्ही तयारी सुरू केली आहे. १९९९ साली मला लोकसभेची उमेदवारी भाजपाकडून जाहीर झालेली होती. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांमुळे उमेदवारी नाकारण्यात आली होती. यावेळी निवडणूक लढविण्यासाठी संकेत मिळालेले असून, तयारी सुरू केली आहे.

विखेंवर जोरदार टीका

लोकसभा निवडणुकीत घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंघोषित नेते तयार होऊन निवडणुकीच्या उमेदवारीबाबत ते घोषणा करीत आहेत. मात्र,येथील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. मिठाईचे बॉक्स  वाटून कोणी खासदार होत नाही. हेही त्यांनी लक्षात घ्यावे, असा आरोप शेलार यांनी विखे यांच्यावर केला.