‘वारकरी पाचपुतेंनी पांडुरंगाच्या चरणी हात ठेवून खरे सांगावे’

राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांचा साकळाईप्रसंगी घणाघात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वत:ला वारकरी म्हणवतात, मग पांडुरंगाच्या चरणी हात ठेवून त्यांनी शपथपूर्वक सांगावे की साकळाईबाबत खरे काय अन् खोटे काय ते. बबनराव पाचपुते जनतेची दिशाभूल करीत आहेत. ते लबाडीत माहीर आहेत. साकळाईचे खरे शत्रू नंबर १ पाचपुतेच आहेत, असा सणसणीत आरोप राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

शेलार म्हणाले की, तत्कालीन मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यावेळी साकळाईची नकार घंटा वाजवली आहे. त्यांचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना साकळाईचा कळवळा आला आहे. सत्ताधारी साकळाईचा मतांसाठी वापर करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.

आमदार राहुल जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची वाळकी येथील घोषणा आणि जलसंपदा मंत्र्यांचे उत्तर यात फरक असल्याने सरकारला कोंडीत पकडले होते. त्यावर बबनराव पाचपुते यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.  १५ वर्षे राष्ट्रवादीला साकळाई का दिसली नाही, पण पाचपुतेही राष्ट्रवादीचे मंत्रीपद उपभोगत होते हे ते सोईस्कर विसरले.

अजित पवार यांच्या माध्यमातून साकळाईसाठी तीन वेळा बैठका लावल्या. तेव्हा हेच बबनराव पाचपुते नकार घंटा वाजवत होते. ते स्वत:ला वारकरी म्हणतात मग पांडूरंगाच्या चरणी हात ठेवून त्यांनी शपथ पूर्वक सांगावे हे खरे की खोटे? असा सवाल घनश्याम शेलार यांनी उपस्थित केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like