हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव

हैदराबाद : वृत्तसंस्था – बहुचर्चित ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले हाेते. कारण ही निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली होती. त्याचबरोबर प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते आले होते. या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, भाजपने जोरदार मुसंडी मारत ४८ जागा मिळवल्या आहेत. याउलट काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले असून, १४६ पैकी केवळ २ जागांवर विजय मिळवला आहे, तर तेलुगू देशम पक्ष चारीमुंड्या चित झाला आहे.

काँग्रेसने या महापालिकेच्या १५० जागांपैकी तब्बल १४६ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, यापैकी केवळ दोनच निवडून आले. काँग्रेसपेक्षाही तेलुगू देशम पक्षाची स्थिती वाईट झाली. कारण त्यांनी तब्बल १०६ जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडणून येऊ शकला नाही. अधिकांश निवडणुकीत भाजपसोबत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतही झाले.

या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष असलेल्या टीआरएसला ५६ जागांवर विजय मिळाला, तर एआयएमआयएमला ४४ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे २०१६ च्या निवडणुकीत केवळ ४ जागा जिंकणाऱ्या भाजपने १२ पट अधिक चांगली कामगिरी करत ४८ जागा जिंकल्या, तर २००९ च्या निवडणुकीत भाजपला ६ जागांवर विजय मिळाला होता.

केसीआर यांच्या पक्षाने सर्वच्या सर्व १५० जागांवर उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी, २०१६ मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत टीआरएसने १५० पैकी ९९ जागा जिंकल्या होत्या, तर एआयएमआयएमने ४४ जागाच जिंकल्या होत्या. काँग्रेसला तेव्हाही दोनच जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असली तरी टीआरएस एआयएमआयएमबरोबर सत्ता स्थापन करू शकतो.