‘हा’ अभिनेता साकारणार ‘मणिकर्णिका’च्या मुख्य सेनापतीची भूमिका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित ठरत असलेला ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यात अभिनेता डॅनी डेन्झोप्पा यांच्या भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला असून त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्याचं समोर आलं आहे. इतकेच नाही तर या चित्रपटामध्ये कंगना व्यतिरिक्त अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि झळकणार आहेत.

दरम्यान प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये डॅनी एका योद्धाच्या रुपात दिसत असून ते घोडेस्वारी करताना दिसत आहेत. डॅनी यांनी या चित्रपटामध्ये गुलाम गौस खान यांची भूमिका वठविली असून गुलाम गौस खान हे राणी लक्ष्मीबाई यांचे मुख्य सेनापती होते हे विशेष. मुख्य म्हणजे काही दिवसापूर्वी या चित्रपटातील अंकिताचा लूक समोर आला होता.  तिचा लूक पाहता प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली होती. त्यात आता डॅनी यांचा लूकही समोर आला आहे.  या चित्रपटात अंकिताने झलकारी बाईची भूमिका वठविल्याचे समजत आहे.

मोठ्या पडद्यापासून फारकत घेतलेले डॅनी मणिकर्णिकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मध्यंतरी डॅनी बायोस्कोपवाला या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटानंतर ते बॅटल ऑफ सारागढ़ीमध्येही झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी अफगान सरदारची भूमिका वठविली आहे. दरम्यान डॅनी यांची भूमिका नक्कीच काहीतरी वेगळी असल्याचं पाहायला मिळणार आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.