दुसऱ्यांदा मैत्रीच्या हाकेला ‘ओ’ देऊन ठरले ‘जायंट किलर’ !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची गेली ६० वर्षांची मैत्री. आपल्या या मित्राला शरद पवार यांनी दुसऱ्यांदा हाक दिली आणि त्यांनी काहीही पुढे मागे न पहाता मित्राला साथ देत झोकून दिले आणि ठरले जायंट किलर. होय श्रीनिवास पाटील यांनी दुसऱ्यांदा आपल्या मित्रासाठी जीवाची बाजी लावत परिवर्तन घडवून आणले. साताऱ्यांतून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव करीत राज्यात एकच खळबळ उडवून दिली.

शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची बीएमसीसी कॉलेजपासून मैत्री आहे. शरद पवार यांच्या कॉलेजमधील काही मोजक्या मित्रांपैकी एक पाटील एक आहे. शरद पवार राजकारणात गेले आणि स्पर्धा परिक्षा पास होऊन श्रीनिवास पाटील सरकारी अधिकारी झाले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या पदावर काम केले तरी पवार यांच्याबरोबरची मैत्री कायम राहिली.

१९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार यांच्या राजकीय प्रवासातील तो एक महत्वाचा टप्पा होता. त्यावेळी सरकारी सेवेत असलेल्या श्रीनिवास पाटील यांना एका दिवशी रात्री शरद पवार यांनी फोन करुन राजीनामा द्या व उद्या मला भेटायला या असे सांगितले. काय, कशासाठी याचा काहीही विचार न करता श्रीनिवास पाटील यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊन शरद पवार यांना भेटायला गेले.

पवार यांनी त्यांना कहाडमधून तुम्हाला निवडणुक लढवायची असल्याचे सांगितले. मित्राने सांगितल्यावर श्रीनिवास पाटील यांनी सर्व सोडून राजकारणात उडी घेतली. १९९९ आणि २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून गेले. २००९ मध्ये पुर्नरचनेत कऱ्हाड हा मतदारसंघ उरला नाही़ म्हणून त्यांनी निवडणुक लढविली नाही. खरं तर साताऱ्याच्या जागेवर त्याचां हक्क होता. पण छत्रपती उदयनराजे भोसले यांना तिकीट दिल्याने ते शांत राहिले.

त्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून विविध कार्यक्रमाला उपस्थित रहात श्रीनिवास पाटील आपले निवृत्तीचे जीवन व्यतित करत होते. वयाच्या ७८ व्या वर्षी ते राजकारणातून निवृत्त झाले होते. पण, लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्याच्या आत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.

सातारा लोकसभासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लढण्यास नकार दिल्याने शरद पवार यांच्या समोर त्यांच्याविरुद्ध कोणाला उभे करावे असा प्रश्न उपस्थित राहिला. त्यावेळी पवार यांना या मित्राची आठवण झाली. त्यांनी श्रीनिवास पाटील यांना हाक दिली. निवृत्तीचे जीवन व्यतित करणाऱ्या श्रीनिवास पाटील मित्राच्या हाकेला धावून गेले. तसा संपूर्ण मतदारसंघ पाटील यांना माहितीचा आणि लोकांनाही पाटील माहितीचे सरकारी अधिकारी आणि खासदार म्हणून त्यांनी असंख्य लोकांची कामे केलेली असल्याने लोकही त्यांना चांगले ओळखत होते.

वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी १२ दिवसात संपूर्ण मतदारसंघ पालथा घातला. आणि ती प्रचाराच्या शेवटच्या दिवसातील पूर्व रात्रीची पावसातील सभा देशभर गाजली. तेव्हा शरद पवार यांच्या पाठीमागे श्रीनिवास पाटील उभे होते. त्यांना पवार यांच्या प्रकृतीची काळजी होती.

त्यानंतर साताऱ्यात परिवर्तन झाले. पवार यांच्या या सभेने परिवर्तनाला चालना दिली तरी त्याची सुरुवात पाटील यांनी आपल्या प्रचारातून केली होती. मित्राला दुसऱ्यांदा हात देताना श्रीनिवास पाटील हे या निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत.